पुष्पा काणे यांच्या जीवननाट्याचे ‘भरतवाक्य’

पुष्पा काणे यांच्या जीवननाट्याचे ‘भरतवाक्य’

शिक्षक संघटनेच्या कामाच्या निमित्ताने माझा काणे कुटुंबाशी अतिशय घनिष्ठ परिचय आहे. वसंतराव काणे यांच्या सुविद्य पत्नी पुष्पा काणे यांनी नोकरी व घर सांभाळून वसंतरावांना साथ दिल्यामुळेच ते शिक्षक परिषदेची कामं करू शकले. या काळात माझा पुष्पावहिनींचे जीवन आणि कार्य यांच्याशी जवळून परिचय झाला होता. त्यांचे १३ जानेवारीला निधन झाले ही वार्ता कानी पडली आणि आठवणींचा पट क्रमाक्रमाने उलगडू लागला. आकाशवाणीच्या नागपूर आणि पुणे केंद्राशी संबंधित रसिकांना पुष्पा काणे यांचा नव्याने परिचय करून देण्याची आवश्यकता नाही. पण ही जुनी पिढी आता हळूहळू काळाच्या पडद्याआड होत चालली आहे. तसेच रेडिओच्या मागून आलेले दूरचित्रवाणी हे धाकटे भावंडं कानामागून येऊन चांगलेच तिखट झाले आहे. तरीही पुष्पा काणे यांचा कर्तृत्वशाली जीवनपट नव्या पिढीलाही प्रेरणादायक ठरावा असा आहे.
कर्तृत्वाची चढती कमान

१९६१ ते १९९४ या प्रदीर्घ कालखंडातील दोन तीन वर्षे वगळता सतत कार्यरत होत्या. ‘वनिताविश्‍वात’ कंपेरर, नंतर अनाऊन्सर, न्यूज रीडर, स्क्रीप्ट रायटर, ड्रामा प्रोड्युसर आणि असिस्टंट स्टेशन डायरेक्टर अशा अनेकविध पदांवर पुष्पाताईंची ‘एण्ट्री’ पदोन्नतीने नव्हे तर मुलाखतीचे दिव्य पार पाडूनच झाली होती. त्यांनी ‘वनिताविश्‍व’ नाट्यविभाग, भाषण विभाग (टॉक्स सेक्शन) यांना आपल्या कामगिरी आणि योगदानाच्या भरवशावर एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले होते. पूर्वाश्रमीच्या पुष्पा दातार यांचे वडील कै. दत्तात्रय धोंडो उपाख्य अण्णासाहेब दातार हे एक रसिक नाट्यप्रेमी आणि कुशल नाट्यकर्मी होते. त्यांच्या तालमीत पुष्पाताई स्वराभिनयातही तरबेज झाल्या होत्या. त्यामुळे जात्याच गोड आवाजाच्या निसर्गदत्त देणगीला त्यांनी स्वराभिनयाची जोड देऊन हजारो रसिकांना मंत्रमुग्ध केले होते.
विपुल चौफेर लिखाण

नोकरी व घर सांभाळून त्यांनी कादंबरी, नाटके, कथा, कविता, तसेच साहित्यविषयक अन्य लेख हे सर्व साहित्यप्रकार यशस्वीरीत्या हाताळले. ‘नभोवाणी कार्यक्रम तंत्र आणि मंत्र’ आणि ‘तंत्र नाट्य दिग्दर्शनाचे’ ही त्यांची या क्षेत्रातील विशेष तंत्राची माहिती देणारी पुस्तके अनुक्रमे कै. वामनराव चोरघडे आणि प्रभाकर पणशीकर यांच्या कौतुकास पात्र ठरली होती, एवढे सांगितले तरी पुरे. रंगमंचावर पुष्पाताईंनी श्रेष्ठ अभिनयाचे रौप्य पारितोषिक ‘महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवात’ पटकावले होते. नागपुरी बोलीवर पुष्पाताईंचे प्रभुत्व होते. या बोलीत लिहिलेली कुष्ठरोग्याच्या जीवनावरील ‘तृषार्त’ ही कादंबरी साधनाताई आमटे यांना विशेष भावली होती. आपल्या नोकरीच्या काळात त्यांनी अनेक नभोनाट्ये लिहिली, सादर केली आणि अनेकांत प्रमुख भूमिका साकारल्या.
आकाशवाणीच्या माध्यमातून विविध प्रयोग

त्यांनी आकाशवाणीत केलेले निरनिराळे प्रयोग रसिकमान्य ठरले. ‘खमंग’ हे ‘रेडिओ कार्टून’ तर गाजलेच. पण त्याचे शीर्षकही इतके चपखल व वेगळे होते की त्याला इंग्रजीत प्रतिशब्दच सापडेना. त्यांनी साकारलेली ‘स्टॉक कॅरेक्टर्स’ वनिताविश्‍वातील ‘मंगलाताई’, प्रतिबिंबातील ‘ताई’, तसेच ‘खमंग’ मधील ‘वहिनी’ श्रोत्यांच्या स्मरणात पक्की ठसली होती. स्त्री जीवनाशी निगडित सर्वस्पर्शी कार्यक्रम सादर करण्यावर त्यांचा कटाक्ष असे. गृहिणीला ‘फुकटावारी मोलकरीण’ किंवा ‘देवता’ मानू नका. तिला बरोबरीच्या साथीदाराचा दर्जा द्या, असा त्यांचा आग्रह असे. सामान्य गणल्या जाणार्‍या महिलाही आपले छंद जोपासत असतात आणि या छंदांना अंत नसतो, हे त्यांना माहीत होते. म्हणूनच ‘माझा छंद माझा आनंद’ या शीर्षकानुसार त्यांनी सुरू केलेली भाषणमालिका तब्बल तीन वर्षे अव्याहतपणे सुरू होती. या मालिकेचे कलात्मक आणि सामाजिक मूल्य पाहून अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आश्‍चर्यमिश्रित आनंद व्यक्त केला होता. चार भिंतींच्या आड राहणार्‍या अनेक ‘गुणी पण बुजर्‍या’ गृहिणींना पुष्पाताईंनी बोलते केले. आपल्या ह्या उपक्रमाचे हे फलित पाहून पुष्पाताईंना कृतार्थतेचा अनुभव आला.
कै. वामनराव चोरघडे व डॉ. वि. भि. कोलते यांच्यापासून प्रारंभ करून त्यांनी ‘मी लिहिता कसा झालो’ ही भाषणमालिका सुरू केली होती. यात अनेक लेखक, कवी, साहित्यिक आदींनी आपले मनोगत मनमोकळेपणाने प्रगट केले. यात कै. भाऊसाहेब पाटणकर, कवी ग्रेस, आशा बगे, मधुकर वाकोडे अशा दिग्गजांनी सादर केलेली मनोगते अनेक दिवस रसिकांच्या आठवणीत होती. टीव्हीने रेडिओला मागे टाकले, हे पुष्पाताईंना मान्य होते. पण रेडिओची स्वतःची अशी अंगभूत वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे या ध्वनी माध्यमाचे स्थान अबाधितच राहील, असा त्यांचा विश्‍वास होता. १९८१ साली त्यांची हृदय शस्त्रक्रिया झाली होती. पण पुष्पाताई या दिव्याला धैर्याने सामोर्‍या गेल्या. १९८१ ते २०१३ पर्यंत त्यांचे हृदय ठणठणीत होते. एप्रिल २०१३ मध्ये त्यांना क्रॉनिक किडनी व्याधीने ग्रासले. १३ डिसेंबर २०१३ पर्यंत त्याच्याशी त्यांनी दोन हात केले. ‘आता बहुतेक पडदा पडण्याची वेळ आली आहे’ असं त्या सहज बोलून गेल्या आणि हेच त्यांच्या जीवननाट्याचे ‘भरतवाक्य’ ठरले.
- द. ए. लंके
(लेखक माजी शिक्षक आमदार आहेत)
०७२६४-२४२१०६

Comments

Popular posts from this blog

लिओ टॉलस्टाय एक विश्वविख्यात साहित्यिक आणि चिंतक

जॅान नॅशचा अपघाती मृत्यू