विलक्षण प्रतिभांचा स्वामी - जाॅर्ज बर्नार्ड शाॅ

विलक्षण प्रतिभांचा स्वामी - जाॅर्ज बर्नार्ड शाॅ
वसंत गणेश काणे,  
 बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्च्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२
 (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०
E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?
 २६ जुलै १८५६ ला ज्याचा जन्म झाला आणि २ नोव्हेंबर १९५० ला ज्याने वयाच्या ९४ व्या वर्षी इहलोकीची यात्रा संपवली तो जाॅर्ज बर्नार्ड शाॅ हे एक विलक्षण व विक्षिप्त नररत्न होते. साहित्य, समाजशास्त्र, व विचावंत म्हणून  जगप्रसिद्ध असलेल्या व्यक्तींमध्ये ज्याचे नाव फार वरचे आहे असा; विचाराने कट्टर समाजवादी पण ईश्वरावर गाढ श्रद्धा असे असे परस्परविरोधी रसायन ज्याच्या स्वभावात होते असा; चक्रमपणा, चिक्कूपणा, बंडखोरी आणि खवचटपणा हा ज्यांचा स्थायीभाव आहे, असे ज्यांचे वर्णन केले जाते त्या आयरिश वंशाचा वारसा लाभलेला; जगमान्य नाट्यलेखक; ज्याच्या नाटकाची प्रस्तावनाच नाटकापेक्षा मोठी असे व बहुदा म्हणून ज्यामुळे ज्याची नाटके प्रयोगक्षमतेपेक्षा किंवा प्रयोगक्षमतेइतकीच प्रस्तावनेसाठीही वाचनीय म्हणूनही गाजली असा;  बोचरी, खवचट आणि प्रखर टीकेसाठी विशेष प्रसिद्धी पावलेला;  राजकारण, नाट्यक्षेत्र व संस्कृती यावर आपला कायमस्वरूपी ठसा उमटवणारा, असे कितीही पैलू सांगितले तरी ज्याच्या व्यक्तिमत्त्वाचा संपूर्ण परिचय करून देता येणार नाही, असा हा जाॅर्ज बर्नार्ड शाॅ!

   शाॅने एकूण साठ नाटके लिहून शेक्सपिअरवरही ताण केली आहे. आधुनिक नाट्याच्या जनकांमध्ये त्याचे स्थान महत्त्वाचे व अढळ आहे.
मॅन अॅंड सुपरमॅन, मिसेस वाॅरेन्स प्रोफेशन, सीझर ॲंड क्लिओपॅट्रा,  ही त्याची काही प्रसिद्ध नाटके पण पिग्मॅलिआॅन हे त्याचे नाटक मराठी वाचक/श्रोते/रसिक यांच्या विशेष परिचयाचे आहे. या आणि अशा नाटकांमुळे शाॅला लोकप्रियता तर लाभलीच पण शाॅच्या रूपाने विनोद, वक्रोक्ती व ऐतहासिक दृष्टांत यांचा उपयोग करणारा प्रभावी नाटककार इंग्रजी साहित्याला १७ व्या शतकानंतर प्रथमच मिळाला.
 आपल्या पिढीचा शाॅ हा प्रथम दर्जाचा समीक्षक ठरला. श्रेष्ठ वक्ता, राजकारण, अर्थशास्त्र व सामाजिक विषयांवर  निबंध स्वरूपात लिखाण करणारा एक प्रथितयश लेखक इंग्रजी साहित्याला  शाॅने दिला. त्याच्या पत्रलेखनाचा पसारा सुद्धा अवाढव्य आहे. १९२५ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक त्याला मिळाले.
   दारिद्र्याच्या झळा सोशीत शाॅ लहानाचा मोठा झाला. १९०० साली तो ब्रिटिश लेबर पार्टीचा आधारस्तंभ झाला. तो समाजवादी होता खरा पण तो क्रांतीचा नव्हे तर सनदशीर  परिवर्तनाचा पुरस्कर्ता होता. समाज परिवर्तनासाठी त्याने आपली वाणी व लेखणी सारख्याच ताकदीने झिजवली. किमान वेतन, सर्वांना समान आरोग्य सेवा, स्त्रियांना मतदानाचा अधिकार, युद्ध आणि हिंसाचाराचा निषेध, परंपरागत व वारसा हक्काने मिळणाय्रा विशेषाधिकारांना विरोध असे विषय त्याने समर्थपणे हाताळले. लंडन स्कूल आॅफ एकाॅनाॅमिक्स अॅंड पोलिटिकल सायन्सच्या संस्थापक सदस्यांना त्याची विशेष मदत झाली. दोन्ही महायुद्धात ब्रिटननेसहभागी होऊ नये, असे त्याचे मत होते व त्याने ते जाहीरपणे नोंदवले देखील होते.
   साहित्यातील नोबेल पारितोषिकासोबत स्वत:च्याच पिग्मेलिआॅन या नाटकाचे 'स्क्रीन प्ले' त रुपांतर केल्याबद्दलचे बेस्ट ॲकॅडेमी ॲवाॅर्ड  मिळालेला हा एकमेव लेखक आहे. या कथेत पांडित्याचे स्तोम माजवणारा भाषा पंडित एका फुले विकणाऱ्या खेडवळ मुलीचे विदुषीत परिवर्तन कसे करतो ते दाखविले आहे. या 'माय फेअर लेडीला' पु. ल. देशपांडे यांनी  'ती फुलराणी' म्हणून मराठमोळा साज चढवला आहे. ही फुलराणी आजही रसिकांच्या हृदय सिंहासनावर अधिराज्य गाजवते आहे, हे आपण जाणतो. अभिनेत्री भक्ती बर्वे हिने साकारलेली भूमिका आजही आपल्या दृष्टिपटलावर कायम आहे. पण तिचा जनमदाता जाॅर्ज बर्नार्ड शाॅ आहे, हे आपल्यापैकी कितीकांना माहित असेल बरे?  पुलंनी कोणते शिवधनुष्य पेलले आहे याची जाणीव 'पिग्मॅलिआॅन' वाचल्याशिवाय व यावर आधारित चित्रपट  व नाटक पाहिल्याशिवाय पूर्णत्त्वाने येणार नाही.
   यानंतर देऊ केलेला प्रत्येक पुरस्कार नाकारणारा शाॅ हा कदाचित एकमेव  साहित्यिक असेल. यात ब्रिटिश सरकारने देऊ केलेले नाईटहूड सुद्धा होते. १९५३ साली 'माय फेअर लेडीचा' जन्मोत्सव ब्राॅडवेवर सादर झाला व ती साहित्यात अमरत्व पावली. दैवदुर्विलास मात्र असा की, ब्राॅडवेवर सादर होऊन अमरत्व पावलेली 'माय फेअर लेडी' पहायला शाॅ मात्र प्रेक्षकात नव्हता.त्याने १९५० सालीच चिरनिद्रा घेण्यासाठी प्रस्थान ठेवले होते. संगीतिकेत रेक्स हॅरिसनची ( भाषा पंडिताची) साथ जुली ॲंन्ड्र्यूजने (कुकनी फ्लावर गर्ल) तर चित्रपटात रेक्ससोबत आॅड्री हेपबर्न आहे.

Comments

Popular posts from this blog

लिओ टॉलस्टाय एक विश्वविख्यात साहित्यिक आणि चिंतक

पुष्पा काणे यांच्या जीवननाट्याचे ‘भरतवाक्य’

जॅान नॅशचा अपघाती मृत्यू