पत्रकारितेतील महामेरू - बेंजामिन ब्रॅडली

पत्रकारितेतील महामेरू - बेंजामिन ब्रॅडली
वसंत गणेश काणे,
बीएससी; एम ए (मानसशास्त्र); एम एड
एल बी ७; लक्ष्मीनगर, नागपूर ४४० ०२२
             (0712)2221689/ 9422804430
Email – kanewasant@gmail.com / Blog –kasa mee?
वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राला आपल्या सव्वीस वर्षांच्या अविरत प्रयत्नांनी जागतिक कीर्ती मिळवून देणारा  बेंजामिन ब्रॅडली हा वयाच्या ९३ व्या वर्षी २१ ऑक्टोबर २०१४ ला निधन पावला. १९६५ साली त्याने वाशिंग्टन पोस्टची धुरा सांभाळली आणि तोपर्यंत एका महानगरातील दैनिक स्वरूपात चाकोरीबद्ध पद्धतीने प्रसिद्ध होणाऱ्या वाशिंग्टन पोस्टचे एका राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर परिणाम करण्याची क्षमाता असलेल्या दैनिकात रुपांतर करूनच त्याने विश्रांती घेतली. वृत्तमूल्य असलेल्या वार्ता आक्रमक पद्धतीने वाचकांसमोर मांडणाच्या  त्याच्या  संपादकीय भूमिकेलाच त्याच्या यशाचे मुख्य श्रेय आहे, असे मानले जाते. प्रफुल्ल व्यक्तिमत्वाची देणगी ही त्याची जन्मजात कमाई होती, तर  नेतृत्व गुण ही त्याची आपकमाई होती. गुणवत्तायुक्त सहकाऱ्यांची निवड करण्याचे त्याचे कौशल्य निर्विवाद होते. पण कोणत्याही प्रतिष्ठानाची यशस्वी वाटचाल होण्यासाठी अशा सहकाऱ्यांना प्रोत्साहन आणि भरभक्कम पाठिंबा आवश्यक असतो, हे तो जाणून होता. तो जागतिक कीर्तीचा संपादक ठरला याच्या मुळाशी जन्मजात गुणसंपदेला त्याने प्रयत्नपूर्वक प्राप्त केलेल्या कौशल्यांची साथ दिली होती, असे मानले जाते.
वॉटर गेट प्रकरण
वॉशिंग्टन पोस्टने उघडकीला आणलेले वॉटर गेट प्रकरण हेच बहुतेकांना माहित आहे. हे राजकीय षडयंत्र या वृत्तपत्राने उघडकीला आणले आणि जागतिक महासत्तेचा सत्ताधीश अभूतपूर्व मानहानी होऊन पायउतार झाला. लेखणीचे सामर्थ्य पुन्हा एकदा जगाच्या प्रत्ययाला आले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्या सांगण्यावरून प्रतिपक्षाच्या कार्यालयातून होणारे दूरध्वनीवरील संभाषण टॅप होत होते. ही वार्ता बाहेर येऊ लागताच ती थांबवावी यासाठी प्रशासनाने जंगजंग पछाडले पण निर्भीडपणा, पत्रकारितेची मूल्ये आणि नैतिकतेची चाड असलेल्या बेंजामिन ब्रॅडलीने सर्व प्रकारचे दबाव साफ धुडकावून लावले. आपल्या चतुर वार्ताहरांच्या पाठीशी तो ठामपणे  उभा राहिला. कार्ल बर्नस्टिंग आणि बॉब वूडवर्ड हे दोघांनी या वार्तेचे हरण  केले होते. या दोघांनाच नव्हे तर अशा अनेक सहकाऱ्यांना बेंजामिन ब्रॅडलीने पूर्ण संरक्षण दिले. सत्यता हा एकमेव निकष तो मानीत असे. ही बातमी सत्य आहे, याची खात्री पटताच तो आपल्या वार्ताहरांच्या पाठीशी परिणामांची सगळी जबाबदारी स्वत:वर घेऊन खंबीरपणे उभा राहिला होता.
व्हिएतनाम युद्धाच्या गोपनीय फायली
कॅथरीन ग्रॅहॅम ही महिला वॉशिंग्टन पोस्टची प्रकाशक असतानाची कथाही अशीच उद्बोधक आहे. व्हिएतनाम युद्धाच्या संदर्भातल्या काही गोपनीय फायली एका हिकमती वार्ताहराने मिळवल्या होत्या. यातील सत्य उघड करण्याचा निर्णय वॉशिंग्टन पोस्ट आणि न्युयॉर्क टाईम्सने घेतला. हे ‘पेंटागॉन पेपर्स’ प्रसिद्ध करू नयेत, असा हुकूमनामा मिळविण्यासाठी निक्सन प्रशासन तिथल्या सुप्रीम कोर्टात गेले. या दोन वृत्तपत्रांचा लढा यशस्वी झाला. सुप्रीम कोर्टाने संपूर्ण हकीकत काटछाट न करता प्रसिद्ध करण्याची अनुमती दिली.
‘प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रीडम’,चा ,मानकरी बेंजामिन ब्रॅडली
बेंजामिन ब्रॅडलीला श्रद्धांजली वाहताना अध्य्क्ष बराक ओबामा यांनी म्हटले आहे की, पत्रकारिता हा त्याचा व्यवसाय नव्हता तर ते त्याचे व्रत होते, तो त्याने स्वीकारलेला वसा होता. तो एक सच्चा पत्रकार होता. कुशल वार्ताहरांची फौज त्याच्या साथीला होती. त्यावेळी या वृत्तपत्रांनी व्हिएतनाम युद्धाच्या संदर्भात जे प्रसिद्ध केले त्यामुळे आम्ही राजकारणी अडचणीत आलो हे खरे पण अशा भूमिकांमुळेच अमेरिकेतील लोकशाहीला बळकटी प्राप्त झाली आहे, हे मान्य केलेच पाहिजे. प्रामाणिकपणा, वस्तुनिष्ठता, सत्यता, बिनचुक वार्तांकन यांचे मापदंड बेंजामिन ब्रॅडलीने उभे केले आहेत. म्हणूनच गेल्यावर्षी ‘प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रीडम’, बेंजामिन ब्रॅडलीला प्रदान करताना मलाच गौरवान्वित झाल्यासारखे वाटत होते.
उपक्रमशील बेंजामिन ब्रॅडलीन
वॉशिंग्टन पोस्टमध्ये तो प्रथम मॅनेजिंग एडिटरच्या पदावर रुजू झाला नंतर तो एक्झिक्युटिव्ह एडिटर पदावर पदोन्नत झाला. या काळात या वृत्तपत्राचा खप दुपटीने वाढला. त्याने जगभर वार्ताहरांचे जाळे उभे केले. अमेरिकेच्या एका किनाऱ्यापासून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत ब्युरोंची (उपकेंद्रे) स्थापना केली. वर्तमानपत्रात निरनिराळे विभाग (आवृत्या) सुरु केले. या प्रकाराचे जगभर अनुसरण झाले, असे मानले जाते. अतिशय प्रतिष्ठाप्राप्त अशी एकूण सातारा पुलिटझर पारितोषिके त्याच्या कारकिर्दीत वॉशिंग्टन पोस्टने पटकावली.
बेंजामिन ब्रॅडली अमेरिकेतील सर्वोत्तम संपादक होता, एवढीच त्याची विशेषता नव्हती तर जगातल्या आधुनिक संपादकांचा तो एक अनुकरणीय आदर्श होता, या शब्दात वॉशिंग्टन पोस्टच्या प्रकाशकाने डोनाल्ड ग्रॅहॅमने (पूर्व प्रकाशक कॅथरीन ग्रॅहॅम हिचा पुत्र आणि उत्तराधिकारी) त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. आम्हाला जे आज जाणवते ते त्याला कितीतरी अगोदर कळलेले असे, कॅथरीन ग्रॅहॅमने आपली श्रद्धांजली वाहतांना म्हटले आहे.
बेंजामिन ब्रॅडलीचा उत्तराधिकारी म्हणतो, १९९१ मध्ये निवृत्त झाला असला तरी आजही तो आमच्या सोबत न्यूज रूम मध्ये आमची सोबत करीत आहे, असे आम्हाला सतत जाणवत असते.
अमेरिकेचे माजी दिवंगत अध्य्क्ष जॉन एफ केनडी हे बेंजामिन ब्रॅडलीचे घनिष्ट मित्र होते. पण खाजगी मित्रता आणि पत्रकारिता या बेंजामिन ब्रॅडलीसाठी दोन समांतर रेषांसारख्या होत्या. त्या कधीही एकमेकीला स्पर्श करू शकल्या नाहीत. मग त्यांचा मेळ होणे तर दूरच राहिले.
बेंजामिन ब्रॅडली पत्रकारितेत येण्यापूर्वी सैन्यात होते. सैनिकाची शिस्त त्यांना या व्यवसायातही उपयोगी पडली असावी. पण ते ओळखले जात ते संपादक म्हणूनच.




Comments

Popular posts from this blog

लिओ टॉलस्टाय एक विश्वविख्यात साहित्यिक आणि चिंतक

पुष्पा काणे यांच्या जीवननाट्याचे ‘भरतवाक्य’

जॅान नॅशचा अपघाती मृत्यू