रहस्यकथा लेखिकेची रहस्य गाथा

               रहस्यकथा लेखिकेची रहस्य गाथा
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्च्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२
दूरध्वनी - (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०
हल्ली मुक्काम - २२१५ लाईव्ह ओक लेन,
यॅार्क,  पेन्सिलव्हॅनिया
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?

     न्यूयाॅर्क टाईम्सच्या पहिल्या पानावर बातमी होती. ती एकाएकी बेपत्ता झाली होती. सुप्रसिद्ध रहस्यकथा लेखिका बेपत्ता!!!  सगळ्या जगभर एक खळबळ उडाली. पोलिस खाते खडबडून जागे झाले. कसून शोध सुरू झाला. एकेक दिवस जसजसा पुढेपुढे सरकत होता तसतसे जनमानस अस्वस्थ होत होते.निरनिराळे तर्ककुतर्क समोर येत होते. वावड्या उठत होते. होम सेक्रेटरी रोज पोलिसात चौकशी करीत. माहिती देणाय्राला १०० डॅालरचे बक्षीस एका वृत्तपत्राने जाहीर केले. एक हजार पोलिस, १५ हजार स्वयंसेवक, आकाशात घिरट्या घालीत अनेक विमाने यांनी सर्व परिसर पिंजून काढला. आपण याॅर्कशाॅयरला जात आहोत, अशा आशयाची चिठ्ठी तिने आपल्या सेक्रेटरीच्या नावे लिहून ठेवली होती. काही दिवसांनी तिची कार एका ओसाड जागी आढळून आली. आतमध्ये तिचे कपडे होते. मुदत संपून गेलेले ड्रायव्हिंग लायसन्सही बाजूला पडले होते. संघर्ष किंवा झटापट झाल्याच्या खुणा दिसत नव्हत्या. ती एकतर स्वत:हून कार टाकून गेली असावी किंवा कोणीतरी तिला धाक दाखवून कार सोडून जाण्यास भाग पाडले असावे. सगळेच मती कुंठीत करणारे होते. शेरलाॅक होम्सचा जन्मदाता सर आर्थर काॅनन डाॅईलने आपल्या संग्रही असलेला तिचा हातमोजा पोलिसांना देऊ केला. कदाचित याचा उपयोग तिचा शोध घेण्यासाठी होऊ शकेल, या कल्पनेने.
     बेपत्ता होण्याच्या संभाव्य कारणांवर चर्चा सुरू झाली. लेखन करूनकरून आपल्याया खूप थकवा आला आहे, अशी तिची तक्रार सुरू झाली होती, ती निराशेने ग्रस्त झालेली वाटायची,  तिच्या आईचे नुकतेच निधन झाले होते, नवरा बदफैली निघाला होता. यापैकी एखादे कारण असेल का? काहीच कळत नव्हते. तपास पुढे सरकत नव्हता. तीन डिसेंबरला नवरा बायकोचे कडाक्याचे भांडण झाले होते आणि लगेच ती बेपत्ता झाली होती. हळूहळू लोक नकारात्मक भूमिका घेऊ लागले. हा तिचा 'पब्लिसिटी स्टंट' तर नसेल ना? अप्रामाणिक नवय्रावर खुनाचा आळ यावा, म्हणून रचलेले कुभांड तर नसेल ना?
    १४ डिसेंबर १९२६ ला शेवटी तब्बल दहा दिवलांनी शोध मोहिमेला यश आले. साहित्यप्रेमींच्या गळ्यातली ताईत असलेली सुप्रसिद्ध रहस्यकथा लेखिका ॲगाथा ख्रिस्ती एकदाची सापडली. स्वान हायड्रोपॅथिक हाॅटेल - आजचे नाव स्वान हाॅटेल - मध्ये ती आढळली. हाॅटेलच्या रजिस्टरवर तिने आपले नाव नोंदवले होते, तेरेसा नील. नील हे तिच्या नवय्राच्या प्रेयसीचे आडनाव होते!  जनतेने सुटकेचा निश्वास टाकला. तमाम रसिकवर्गाचा दहा दिवस टांगणीला लागलेला जीव भांड्यात पडला. पण चिंता मिटली नव्हती. ॲगाथा भ्रमिष्ट झाली होती. तिला ॲम्नेशियाचा ( विस्मरण) अटॅक आला होता. या भग्नमनावस्थेवर उपचार करता करता मानसोपचार तज्ञांची चमू कारणांचा शोध घेऊ लागली. पण शेवटपर्यंत नक्की निदान झाले नाही. नेहमीप्रमाणे तज्ञांमध्ये मतभेद झाले. पण हळूहळू ती 'नाॅर्मलवर' आली.
  ॲगाथा ख्रिस्तीची १२५ वी जयंती १५ सप्टेंबरला२०१५ ला जगभर साजरी झाली. १५ सप्टेंबर १८९० ला या लोकप्रिय लेखिकेचा जन्म झाला होता. तिला जाऊन आता चाळीस वर्षे होत आहेत. मरणोत्तरही ती तितकीच लोकप्रिय आहे. तिला समीक्षक अभिजात लेखिका मानतात. काही लेखक लोकप्रिय असतात. तर काही अभिजात लेखनासाठी प्रसिद्ध असतात. लोकप्रियता, अभिजातता, मरणोत्तरही लोकप्रियता आणि तीही एखाद्या लेखिकेच्या वाट्याला, असे क्वचितच आढळते.
डेम ॲगाथा मेरी क्लॅरिसा ख्रिस्ती - डेम ॲगाथा मेरी क्लॅरिसा ख्रिस्ती ( १५ सप्टेंबर १८९० - १२ जानेवारी १९७६) ही ब्रिटिश लेखिका गुन्ह्यावर कादंबय्रा व लघुकथा लेखिका तसेच नाट्यलेखिका म्हणून गाजली, जगभर मान्यता पावली. तिच्या एकूण सहा प्रेमकथाही आहेत पण त्या टोपणनावाने लिहिलेल्या आहेत. एकूण सहासष्ट रहस्य कादंबय्रा व १४ लघुकथा तिच्या स्वत:च्या खाती जमा आहेत. तिची स्वत:ची अशी स्वतंत्र लेखनशैली होती. सर आर्थर काॅनन डाॅईल यांचा एकच मानसपुत्र होता, शेरलॅाक होम्स. पण हिचे अनेक गुप्तहेर मानसपुत्र होते/ कन्याही होत्या. हरक्यूल पॅायरॅाट, जेन मार्पल, पारकर पाईन, हार्ले क्विन अशी नावे आजच्या एका टीव्ही मालिकेतील अस्मिताप्रमाणे घरोघरी अगदी किचनपर्यंत पोचली होती. जगातले सगळ्यात लांबलचक नाटक 'माऊस ट्रॅप' हे एक रहस्यमय कथेवर आधारित असून ते तिच्या नावावर आजही विक्रमी लांबीचे म्हणूनच आहे. या नाटकाचे आजवर २५,०००प्रयोग झाले असून अजूनही ते होतच असतात. ब्रिटिश राजसत्तेने 'डेम' ही पदवी प्रदान करून तिचा गौरव केला होता. पुरुषांचा गौरव 'नाईटहूड' प्रदान करून तर स्त्रियांचा 'डेमहूड' प्रदान करून केला जात असे. ॲगाथाचा गौरव तिच्या साहित्यक्षेत्रातील योगदानानबद्दल करण्यात आला होता ( आपल्याकडे पद्मश्री वगैरे पदव्या आहेत, तसा प्रकार). असे अनेक गौरव तिच्या खात्यावर जमा आहेत. त्यातले अनेक आजवर मोडले गेलेले नाहीत. टी व्ही, रेडिओ, व्हिडिओ गेम्स व कॅामिक्स या सर्व माध्यमांना तिची भुरळ पडली आहे. सहाशे सदस्य संख्या असलेल्या क्राईम रायटर्स असोसिएशनने तिची   'दी मर्डर आॅफ राॅजर ॲक्राॅईड' ही कादंबरी सर्वोत्तम कादंबरी म्हणून १५ सप्टेंबर २०१५ ला तिच्या १२५ व्या जयंतीच्या नुहुर्तावर घोषित केले आहे
     एका उच्चमध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या ॲगाथाने पहिल्या महायुद्धात एका हॅास्पिटलमध्ये काम केले होते. हरक्यूल पॅायरॅाट हा तिचा पहिला मानसपुत्र मानला जातो. सर्वाधिक खप असलेल्या कादंबय्रा लिहिणारी कादंबरीकार म्हणून गिनीज बुकात तिची नोंद आहे. खपाच्या दृष्टीने विचार केला तर शेक्सपीअरचे साहित्य, बायबल यानंतर क्रम लागतो ॲगाथा ख्रिस्तीचा. जगातल्या एकूण १०३ भाषात तिच्या साहित्याचे भाषांतर झाले आहे. हा विक्रमही अजूनतरी कुणी मोडलेला नाही.
डेथ ऑन दि नाइल, डेथ कम्स ॲज दि एण्ड, मर्डर ऑन दि ओरिएंट एक्स्प्रेस, पेल हॉर्स, मिरर क्रॅक्ड फ्रॉम साइड टु साइड, कर्टन, माउस ट्रॅप, ॲंड देन देअर वेअर नन,  विटनेस फॅार प्रॅासिक्यूशन ही नावे सुद्धा सार्थ असणार याची कल्पना वाचकांना देतात आणि तिला मिळालेले  डचेस ऑफ डेथ’, क्वीन ऑफ क्राइम, रहस्यसम्राज्ञी हे किताब रसिकांनी का दिले असतील हे लक्षात येते
  अभिजाततेचा मान तिच्या रहस्यकथांच्या लिखाणाला प्राप्त होण्यासाठी काही  वैशिष्ट्येही कारणीभूत झाली असावीत.
१. तिच्या साहित्यात अनुभवविश्वाची संपन्नता वाचकांना जाणवते.
२. स्थळ काळात विविधताही नाविन्यात भर घालते.
३. रहस्याची उकल शेवटपर्यंत व्हावयास नको, तशी ती होत नाही.
४. सामान्यत: रहस्याचा उलगडा झाला की वाचकांची उत्सुकता संपते व कादंबरीही संपते. असे मर्यादित व एकप्रकारे क्षणभंगूर  जीवन रहस्यकथांच्या वाट्याला आलेले असते. पण ॲगाथाच्या ख्रिस्तीच्या कथा, कादंबय्रा पुन्हा पुन्हा वाचावाशा वाटतात.
५. उत्कंठा सतत वाढत राहिली पाहिजे, तशी ती राहते.
६. लेखिकेचे लेखनव्रत जीवनभर कायम होते.
ॲगाथा ख्रिस्तीच्या जीवनावरील चित्रपटाने उडालेला भडका - 'डेथ ऑन दि नाईलचे' कथानक नाईल नदीवरील एका जहाजावर घडते आहे. 'डेथ कम्स ॲज दि एण्डचे' कथानक ४००० वर्षांपूर्वीच्या इजिप्तमधील थडग्याशी संबंधित पुजाय्राच्या जीवनाशी संबंधित आहे. 'मर्डर ऑन दि ओरिएंट एक्स्प्रेस' ही एक सूडकथा आहे तर 'मिरर क्रॅक्ड फ्रॉम साइड टु साइड' ही अभिनेत्रीच्या जीवनातील निराशा चित्रित करते. कर्टन, माउस ट्रॅप, ॲंड देन देअर वेअर नन,  विटनेस फॅार प्रॅासिक्यूशन या आणि अशा सर्व साहित्यकृतीत कथानकाला साजेशी  वेगवेगळी पार्श्वभूमी ॲगाथाने योजिली आहे.
         ॲगाथाने आत्मचरित्र लिहिले आहे पण त्यात तिच्या जीवनातील 'बेपत्ता प्रकरण' मात्र बेपत्ता आहे. एका चित्रपट निर्मात्याने या प्रकरणावर आधारित एक काल्पनिक चित्रपट काढला. ह्या चित्रपटातील कथेचा  वास्तवातील व्यक्तीशी काहीही संबंध नाही, असा फलक त्यात सुरवातीलाच दाखवलेला आहे. त्यात असे दाखविले होते की, ॲगाथाने आत्महत्या करायचे ठरवून असा घाट घातला होता की, तिच्या हत्येचा आळ तिच्या नवय्राच्या प्रेयसीवर येईल. पण एका अमेरिकन वार्ताहराला या बनावाचा सुगावा लागतो आणि ऐनवेळी तो तिला थांबवतो.ही चित्रकथा पाहून ॲगाथाचे चाहते चांगलेच खवळले. त्यांच्या अंगाचा तिळपापड झाला. त्यांनी संबंधितांना कोर्टात खेचले आणि चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली. पण अमेरिकन कोर्टाने हे दावे फोल ठरवले. ॲगाथाची भूमिका सुप्रसिद्ध अभिनेत्री वनेसा रेडग्रेव्हने तर नवय्राची भूमिका तिमोथी डाल्टनने सजीव केली होती.वार्ताहराची भूमिका डस्टिन हॅाफमनने वठवली होती.
    पण वस्तुस्थिती काय होती हे बाहेर यावे म्हणून शोधपत्रकारितेला घुमारे फुटण्यास एक चांगले निमित्त मिळाले. यानुसार बळकटी या कथेला मिळाली की, ॲगाथाने आपल्या नवय्राला लाजेने मान खाली घालावी लागावी, म्हणून हा सर्व डोलारा उभा केला होता. एका सिद्धहस्त रहस्यकथाकार लेखिकेने बदफैली पतीचे पितळ उघडे पाडण्यासाठी रचलेला हा एक 'सुसंस्कृत व अहिंसक डाव' होता. पण स्वत: एक अद्वितीय रहस्यकथाकार असूनही या 'बेपत्ता नाट्याचा' शेवट तिच्या अपेक्षेप्रमाणे झाला नाही. कथेने भलतेच वळण घेतले. सत्य काय होते कुणास ठावूक.
   ॲगाथाने १९२८ मध्ये नवय्रापासून घटस्फोट घेतला. मुलीचा ताबा मिळवला आणि ख्रिस्ती अडनाव कायम ठेवले. तिने आपल्यापेक्षा सोळा वर्षाने लहान आरकिआॅलाॅजिस्टशी(पुरातत्त्ववशास्त्री) विवाह केला. तिने एके ठिकाणी म्हटले आहे की, नवरा म्हणून पुरातत्त्वशास्त्री चांगला असतो. कारण त्याचा स्वभाव असा असतो की,  वास्तू जसजशी जुनी होत जाते, तसतशी ती त्याला अधिकाधिक आवडू लागते. नवीन नवय्राची इच्छा तिने दारू प्यावी अशी होती. पण मला आपले पाणीच बरे वाटते, असे ती म्हणायची. मोठ्या मुष्किलीने व आवडत नसून सुद्धा ती सिग्रेट ओढायला तयार झाली. पण एका अटीवरच. दिवसा लंचनंतर आणि रात्री डिनर नंतरच म्हणजे दिवसातून फक्त दोनदाच ती सिग्रेटीओढायची. पण जेमतेम सहा महिनेच हा प्रकार सुरू राहिला. पण तिचे पुढचे आयुष्य सुखात गेले. नवीन नवय्रामुळे तिला खूप फिरता आले. कथा गुंफतांना निरनिराळी पृष्ठभूमी निवडता आली. एकाहून एक सरस कथा रचता आल्या

Comments

Popular posts from this blog

लिओ टॉलस्टाय एक विश्वविख्यात साहित्यिक आणि चिंतक

पुष्पा काणे यांच्या जीवननाट्याचे ‘भरतवाक्य’

जॅान नॅशचा अपघाती मृत्यू